नवी दिल्ली – एकीकडे अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असताना कर्नाटकात मात्र त्या अगोदरच वातावरण पेटण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे कर्नाटक पोलिसांनी बाबरी प्रकरणी एका व्यक्तीला आता म्हणजे ३१ वर्षांनी अटक केली आहे. बाबरी मशिद पतनानंतर ज्या दंगली उसळल्या होत्या त्याच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. एका कारसेवकाला अटक करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी कर्नाटक सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाली आहे.
काही लोकांना राम मंदिर खटकते आहे. या अटकेच्या विरोधात आम्ही संपूर्ण कर्नाटकात आंदोलन करू असे भाजपने म्हटले आहे. १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पडल्यानंतर देशभरात निदर्शने झाली होती. त्यात हुबळी येथे अल्पसंख्य समुदायातील एका व्यक्तीचे दुकान जाळण्यात आले होते. या प्रकरणात ५० वर्षीय व्यक्ती श्रीकांत पुजारी याला आरोपी करण्यात आले होते. आता ३१ वर्षांनी कर्नाटक पोलिसांनी पुजारी याला अटक केली आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अगोदर जाणीवपूर्वक ही अटक करण्यात आली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्य सरकार एसडीपीआय तसेच पीएफआयच्या विरोधात कारवाई करत नाही, मात्र कारसेवकांना लक्ष्य केले जाते आहे.
दरम्यान, आता कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सिध्दरामय्या यांनीही यावर भाष्य केले आहे. कोणी काही चूक केली असेल तर त्याला सरकार काय करू शकते? कोणा अपराध्याला असे मोकळे सोडले जाऊ शकत नाही. जे काही केले जाते आहे ते सगळे कायद्यानुसार आहे. कोणा निर्दोष व्यक्तीला अटक केलेली नाही. हे द्वेषाचे राजकारण नाही. तर कर्नाटक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र श्रीकांत पुजारीची तात्काळ सुटका केली जाण्याची मागणी केली आहे. सरकार हिंदु भक्तांना अटक करते आहे.