नवी दिल्ली – कतार येथील अल जझीरासाठी वार्तांकन करणाऱ्या गाझा येथील एका पत्रकारावर इस्त्रायलच्या सुरक्षा दलाने अर्थात आयडीएफने गंभीर आरोप केले आहेत. संबंधित पत्रकार हा हमास या संघटनेसाठी कमांडर म्हणून काम करत होता असे आयडीएफने म्हटले आहे. मुहम्मद वाशाह असे त्याचे नाव असून त्याचा एक लॅपटॉप गाझा पट्टीच्या उत्तर भागात इस्त्रायलच्या लष्कराकडून जप्त करण्यात आला होता. त्यानंतर हे आरोप त्यांनी केले आहेत.
लॅपटॉपमध्ये असे काही फोटो आढळून आले होते की त्यावरून वाशाह हा हमाससाठी एक वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत असल्याचे मानण्यास जागा निर्माण झाली होती. त्या फोटोंमध्ये हा ३२ वर्षीय पत्रकार हातात विविध शस्त्रे घेऊन उभा असलेलाही दिसून आला होता.
इस्त्रालयवर हमासने ७ ऑक्टोबर रोजी जो घातक हल्ला केला होता त्यावेळी ज्या शस्त्रांचा वापर हमासने केला होता त्या शस्त्रांसारखीच मिळतीजुळती शस्त्रे वाशाह याच्या हातात आढळून आली होती.
दरम्यान, या प्रकारानंतर आयडीएफने अल जझीरालाही लक्ष्य केले आहे. तुम्ही पत्रकारांना स्थितीबाबत निष्पक्षपणे वार्तांकन करण्याचे सांगायला हवे. त्यांना दहशतवाद्यांसोबत पुढच्या रांगेत उभे राहुन युध्दात सक्रिय भाग घ्यायला सांगायला नको असे अल जझीराला सुनावले आहे.