दुबई – भारतातील ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला लवकरच आपली अकासा एअरलाईन ही नागरी विमान कंपनी सुरु करणार आहेत. या कंपनीची विमाने मार्च -एप्रिल महिन्यापर्यंत अवकाशात झेपावतील. दुबईत सध्या विविध विमान कंपन्या आपल्या विमानाचे प्रदर्शन करीत आहेत. यावेळी झुनझुनवाला यांनी बोईंग विमान कंपनीकडे तब्बल 72 इतक्या 737 मॅक्स विमानाची ऑर्डर दिली असल्याचे समजते. 72 विमानाची किंमत तब्बल 9 अब्ज डॉलर इतकी आहे. एक अब्ज डॉलर म्हणजे साधारणपणे 8 हजार कोटी रुपये होतात.
फ्रान्सची एअरबस कंपनी नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सध्या वेगाने पुढे जात होती. बोईंग कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे आता बोईंग कंपनी स्पर्धेतील आपले स्थान सुधारणार आहे. मॅक्स विमानाचे दोन अपघात झाल्यामुळे या विमानावर बऱ्याच देशांनी बंदी घातली होती.
मात्र नंतर या विमानाच्या यंत्रणेत सुधारणा करण्यात आल्यानंतर अमेरिकेसह भारताने या विमानावरील बंदी उठवली आहे. झुनझुनवाला यांना भारतातील वॅरेन बफे संबोधले जाते. भारतातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगो या कंपनीच्या माजी पदाधिकाऱ्यासोबत झुनझुनवाला अकासा एअरलाईन नावाची नागरी विमान वाहतूक कंपनी सुरू करीत आहेत.
त्याच्या विमान कंपनीला ऑक्टोबर महिन्यात भारत सरकारने परवानगी दिली असून काही महिन्यातच ही विमान कंपनी सुरू होणार आहे. विमान प्रवासावरील सर्व बंधने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे आमच्या विमान कंपनीला पुरेसे प्रवासी मिळतील असे आकासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी सांगितले.