नवी दिल्ली – एक वर्षात पोलाद व सिमेंटच्या दरात भरमसाठ वाढ झाल्यामुळे विकसकांनी चिंता व्यक्त केली आहे. जर कच्च्या मालाचे दर कमी झाले नाहीत तर देशात घरांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचे क्रेडाई या विकसकांच्या संघटनेने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात प बंगालमधील विकसकांनी घराचे दर वाढणार असल्याचे सांगितले होते. सरकारने कच्च्या मालाचे दर कमी करण्यासाठी या मालावरील जीएसटी कमी करण्याची गरज असल्याचे क्रेडाईने म्हटले आहे. जानेवारी 2020 पासून कच्च्या मालाचे दर एकतर्फी वाढत आहेत. त्याचबरोबर गेल्या 18 महिन्यापासून लॉक डाऊनसारख्या विविध कारणामुळे बऱ्याच प्रकल्पांचे बांधकाम रखडले आहे.
क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडीया यांनी सांगितले की, विकसकांची दरवाढ सोसण्याची क्षमता समाप्त झाली आहे. त्यामुळे सरकारने कच्च्या मालाचे दर कमी न केल्यासा दरवाढ करण्याशीवाय आमच्याकडे पर्याय नाही.
जर तसे झाले तर त्याचा स्वस्त घरांच्या पुरवठयावर परिणाम होऊ शकतो असे त्यानी सांगितले. महागाईचा सर्व क्षेत्रावर परिणाम होत असलून बांधकाम क्षेत्र त्याला अपवाद नसल्याचे त्यानी सांगितले. इन्व्हेंट्र कमी करण्यासाठी विकसकांनी आतापर्यंत कमी नफ्यावर घर विक्री केली असल्याचे त्यानी सांगितले.