न्यूयॉर्क – गेल्या 20 वर्षात जागतिक संपत्ती 156 लाख कोटी डॉलरवरून 514 लाख कोटी डॉलर झाली आहे. या कालावधीत चीनची संपत्ती सात लाख कोटी डॉलरवरून 120 लाख कोटी डॉलर झाली आहे. याच कालावधीत अमेरिकेची संपत्ती केवळ दुपटीने वाढून 90 लाख कोटी डॉलर झाली आहे. त्यामुळे चीनी आता जागतिक पातळीवर सर्वात श्रीमंत देश झाला आहे.
मॅकेन्झी या संस्थेने 2020 पासून जागतिक समृद्धीचा आढावा घेऊन तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ज्या दहा देशाची संपत्ती जागतिक संपत्तीच्या 60 टक्के इतके आहे, त्या देशाच्या ताळेबंदाचा या संस्थेने आढावा घेतला आहे.
चीन आणि अमेरिकेशिवाय यादीत जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, मेक्सिको आणि स्वीडन या देशाचा समावेश आहे. अभ्यासातील निष्कर्षाचे वैशिष्टय म्हणजे या श्रीमंत देशातील दोन-तृतीयांश समृद्धी केवळ दहा टक्के घरात केंद्रित झाली आहे.
पहिल्या दहा देशातील संपत्ती रिअल इस्टेट पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री आणि उपकरणे या क्षेत्रात जास्त प्रमाणात केंद्रित झाली असल्याचे दिसून येते. आश्चर्याची बाब म्हणजे ही समृद्धी बौद्धिक संपदा हक्कामध्ये केंद्रित झालेली नाही. गेल्या 20 वर्षांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात झालेल्या वेगवान घडामोडींमुळे चीन आणि अमेरिकेसह श्रीमंत देशांच्या समृद्धीत जास्त वाढ झाली असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे एकूण जागतिक समृद्धीतीत 3 पट वाढ झाली असली तरी सर्व देशाच्या समृद्धीमध्ये समान प्रमाणात वाढ झालेली नाही. याचा अर्थ श्रीमंत देश अधिकाधिक श्रीमंत होत चालले आहेत असे दिसून येते. जागतिक समृद्धीत समान पद्धतीने वाढ होत नसल्यामुळे आगामी काळामध्ये गरीब आणि श्रीमंत देशातील मतभेद वाढू शकतात, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. 1980 नंतर चीनने आर्थिक क्षेत्रात सुधारणा सुरू केल्या. 2005 पासून चीनने अधिक नेटाने आर्थिक सुधारणा लागू केल्यामुळे या 20 वर्षांमध्ये चीनच्या समृद्धीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते.