नवी दिल्ली – टाटा समूहाने मंगळवारी फ्रेंच कंपनी एअरबससोबत ऐतिहासिक करार केला. कराराअंतर्गत टाटा समूह एअर इंडियासाठी तब्बल 250 विमाने खरेदी करणार असून, दोन्ही कंपन्यांमधील हा करार आतापर्यंतचा सर्वांत मोठा करार असल्याचे बोलले जात आहे. या करारांतर्गत एअरबसकडून 40 वाइड-बॉडी ए-350 आणि 210 लहान-बॉडी विमाने एअर इंडिया खरेदी करणार आहे.
करारासाठी एअर बससोबत झालेल्या या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, रतन टाटा, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आदी उपस्थित होते. विकत घेण्यात येणाऱ्या मोठ्या आकाराच्या ए-350 विमानांचा वापर 16 तासांपेक्षा जास्त कालावधीच्या लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी केला जाईल. गेल्या वर्षी जानेवारीत एअर इंडिया टाटा समूहाचा भाग बनल्यापासून, टाटा समूह या विमान कंपनीला पुढे नेण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.
अखेरची खरेदी 2005 मध्ये
एअर इंडियाने 2005 मध्ये 111 विमानांच्या खरेदीसाठी शेवटची ऑर्डर दिली होती. त्यापैकी 68 विमाने बोईंगकडून तर 43 एअरबसकडून खरेदी करण्यात आली होती. एअर इंडिया टाटा समूहाचा भाग बनल्याला 27 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण केले आहे. त्यावेळी, भविष्यातील कंपनीच्या वाढीसाठी ऐतिहासिक विमान खरेदी करार करणार असल्याचे संकेत दिले होते. त्याअंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये एअर इंडियासाठी परिवर्तनाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
“आजच्या ऐतिहासिक करारासाठी एअर इंडिया आणि एअर बसचे अभिनंदन आणि शुभेच्छा. हा महत्त्वाचा करार भारत आणि फ्रान्समधील घनिष्ठ संबंध तसेच भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील यश आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतो.”
– पंतप्रधान नरेंद्र मोदी