मुंबई – झुंड या सिनेमाला सरकारने करमुक्ती देण्याचा निर्णय घ्यायला हवा अशी मागणी या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सविता राज हिरेमठ यांनी केली आहे. आपला चित्रपट करमुक्त का करण्यात आला नाही या बाबत मी संभ्रमात आहे असे त्यांनी म्हटले आहे. “फॅंड्री” आणि “सैराट” या गाजलेल्या मराठी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांचे हिंदी चित्रपट सृष्टीतील पदार्पण या चित्रपटाने झाले आहे. झुंड नंतर आलेल्या काश्मीर फाइल्स या चित्रपटाला अनेक राज्यांनी करमुक्ती केली आहे.
या सिनेमाला अनेक केंद्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सविता हिरेमठ यांनी ही सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे की काश्मीर फाइल्स हा चित्रपट महत्वाचा असला तरी झुंड हा सिनेमाही काही कमी महत्वाचा नाही.
काश्मीर फाइल्स चित्रपटाला केंद्र सरकारकडून पाठिंबा मिळाला, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी चित्रपटाला पाठिंबा दिला. सविता हिरेमठ यांनी म्हटले आहे की, ‘झुंड’ची निर्माती म्हणून मी गोंधळून गेले आहे. शेवटी, ‘झुंड’ हा देखील एक महत्त्वाचा चित्रपट आहे आणि त्याची कथा महत्वाची असून त्यातून एक मोठा संदेश दिला गेला आहे, ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रशंसा आणि समर्थन मिळाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
“झुंड” ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज हिरेमठ, गार्गी कुलकर्णी, मीनू अरोरा आणि मंजुळे यांनी एकत्रितपणे केली आहे. हिरेमठ यांनी पुढे लिहिले की, करमुक्तीसाठी चित्रपट निवडण्यासाठी आणि त्याला करमणूक करातून सूट देण्यासाठी सरकारचे निकष काय आहेत हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.
मला हे जाणून घ्यायचे आहे की सरकार कोणत्या निकषावर चित्रपट निवडते ते करमुक्त करून, सोशल मीडियाद्वारे त्याचे समर्थन करते आणि कार्यालयांना चित्रपटाचे प्रदर्शन करण्यास सांगून किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यास सांगून त्याचे जोरदार समर्थन करते.