मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हा ट्रेलर काही वेळातच लाखो लोकांनी बघितला आहे.
चित्रपटाचा ट्रेलर पाहुन प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने नुकताच हा चित्रपट पाहिला. आमिरसाठी या चित्रपटाचं प्रायव्हेट स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले. टी सीरिजनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आमिर झुंड चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये आमिर म्हणाला, ‘हा चित्रपट यूनिक असून सर्व कलाकारांनी खूप चांगले काम केलेय. तो पुढे म्हणाला,’जे आम्ही गेल्या 20-30 वर्षांत करू शकलो नाही, ते नागराजनं या एका चित्रपटातून करून दाखवलं आहे., मी माझ्या करिअरमध्ये आजवर जे शिकलोय जे आम्ही गेल्या 20-30 वर्षांत करू शकलो नाही, ते नागराजनं या एका चित्रपटातून करून दाखवलं आहे. त्या सर्व गोष्टींचा यांनी फूटबॉल केलाय’
या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाबाबत तो म्हणाला, ‘अमिताभ बच्चन यांनी अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे पण हा त्यांच्या सर्वात चांगल्या चित्रपटांमधील एक चित्रपट आहे. तसेच या चित्रपटात लहान मुलांनी देखील चांगलं काम केलं आहे. ‘ चित्रपट पाहिल्यानंतर आमिर या चित्रपटातील कलाकारांना भेटला.
दरम्यान,या चित्रपटात अमिताभ बच्चन निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे आणि त्यांच्या टीमच्या संघर्षाची कहाणी झुंड मध्ये पाहायला मिळणार आहे. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न विजय पाहत असतात.
मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांना कॉलेज कॅम्पसमध्ये आणण्याला अनेकांचा विरोध असतो. अशा मुलांचं आयुष्य ते कशा पद्धतीने बदलतात हे सर्व या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच, आणखी एक विशेष बाब म्हणजे झुंडच्या निमित्ताने महाराष्ट्राची लाडकी आर्ची-पारश्याची जोडी म्हणजेच, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. दरम्यान, नागराजचा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या 4 मार्चला मोठ्या पडद्यावर पदर्शित होणार आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अनेक अडचणी आल्या होत्या.