मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून, सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. बॉलिवूड पासून ते साऊथ पर्यंत सर्वांनीच ‘झुंड’ बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे.
सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न उरी घेऊन निघणाऱ्या क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांची कहाणी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. ‘झुंड’मध्ये बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अमिताभ बच्चन निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच, 4 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर अपेक्षेनुसार चांगली कमाई केली आहे. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कोटींचा टप्पा गाठला आहे.
या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी 2.10 कोटींचा व्यवसाय केला आहे. अजून सुद्धा झुंड चित्रपटाने कमाईच्या बाबतीत यशस्वी घौडदौड सुरूच ठेवली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये हा चित्रपट तिकीट बारीवर आणखी कमाल दाखवेल हे पाहणे गरजेचं आहे.