नवी दिल्ली – युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात जपानचे पंतप्रधान किशिदा पुढील 5 वर्षात भारतात 42 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करणार आहेत.
पीएम किशिदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी रशिया आणि युक्रेनबाबत महत्त्वाची चर्चा करू शकतात, असे मानले जात आहे. 2022 मध्ये, जपानचे पंतप्रधान भारताला भेट देणारे पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत.
जपानी वृत्तसंस्था निक्केईच्या अहवालानुसार, पंतप्रधान किशिदा भारताला 2.5 अब्ज डॉलरचे कर्ज देण्यासही सहमत होऊ शकतात. तसेच त्यांच्या या दौऱ्यात भारतातील जपानी कंपन्यांच्या विस्ताराबाबत घोषणा होऊ शकते. 2014 मध्ये शिंजो आबे पंतप्रधान असताना जपानी गुंतवणुकीचे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ताज्या गुंतवणुकीच्या घोषणेसह, किशिदा आता शिंजो आबे यांनाही मागे टाकतील. जिथे शिंजो आबे यांनी 3.5 ट्रिलियन येन गुंतवणुकीची घोषणा केली होती, तिथे आता 5 ट्रिलियनची गुंतवणूक होणार आहे.
सध्या जपान भारतातील शहरांच्या आधारभूत विकासासाठी मदत करत आहे. या व्यतिरिक्त जपानच्या मदतीनेच भारतातील बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट सुरू आहे. पंतप्रधान किशादा हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असून भारत आणि जपान यांच्यातील 14 शिखर संमेलन पार पडणार आहे.