नागपूर – दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून, सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. बॉलिवूड पासून ते साऊथ पर्यंत सर्वांनीच ‘झुंड’ बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान असो…वा साऊथ सुपरस्टार धनुष… किंवा राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार…. चित्रपटसुष्टी सोबतच राजकीय क्षेत्रातील सर्वच दिग्गज मंडळींनी चित्रपटावरुन नागराज मंजुळेंवर आणि चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली आहेत. आता, तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सुद्धा नागराज मंजुळेची कौतुकाने पाठ थोपटली आहे.
रविवार नागपुरात झुंड चित्रपटाचा प्रीमियर शो ठेवण्यात आला होता. यासाठी झुंड चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांच्यासह टीमचे कलाकार यावेळी उपस्थित होते. झुंडची पूर्ण टीम नागपुरात दाखल झाल्यानं संपूर्ण टीमची जल्लोषात खुल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोलताशांच्या गजरात स्वागतही करण्यात आले.
या प्रीमियवर शो ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी गडकरी नागराजच कौतुक करताना म्हणतात की….., “नागराज मंजुळेंच्या गुणवत्तेला प्रमाणपत्राची गरज नाही, नागराज हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. आउट ऑफ बॉक्स विचार करून सुंदर चित्रपटाच निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे यांनी स्वतःच्या कामाला सिद्ध केले आहे.’ असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
झुंड चित्रपटात सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न उरी घेऊन निघणाऱ्या क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांची कहाणी या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. ‘झुंड’मध्ये बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अमिताभ बच्चन निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे.