Jharkhand Floor Test : झारखंडमधील चंपाई सोरेन सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बहुमत चाचणी दरम्यान, चंपाई सोरेन सरकारच्या बाजूने 47 मते पडली तर त्यांच्या सरकारच्या विरोधात 29 मते पडली. न्यायालयाच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन देखील बहुमत चाचणीमध्ये भाग घेण्यासाठी पोहोचले होते.
बहुमत चाचणीच्या आधी विधानसभेत बोलताना झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपला आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आणि आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडू असे सांगितले. केंद्राने कट रचल्यानंतर त्याच्या अटकेत राजभवनने महत्त्वाची भूमिका बजावली, असा आरोपही त्यांनी केला.
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळाप्रकरणात मनी लॉड्रिंगप्रकरणात ईडीने 31 जानेवारीला अटक केली, त्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. या बहुमत चाचणीला हेमंत सोरेन देखील उपस्थित होते, यावेळी त्यांनी भावनिक भाषण केलं. झारखंड मुक्ती मोर्चा नेतृत्त्वातील 40 आमदार थेट हैदराबादमध्ये गेले होते. त्यानंतर काल रात्री ते रांचीला परतले.
झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून 2 फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक केली, त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) चंपई सोरेन यांना पद आणि गोपनियेतेची शपथ दिली होती. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिला होता.