शहरातील सोनसाखळी चोरही “अनलॉक’

वानवडी, कोंढवा परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले

 

पुणे – वानवडी व कोंढवा परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावल्याच्या दोन घटना समोर आल्या. शहर अनलॉक होत असताना शहरातील व्यवहार पूर्वपदावर आल्याने चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत.

भाजी खरेदी केल्यानंतर दही घेण्यासाठी डेअरीकडे निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास साळुंखे विहार रोड कोंढवा येथे घडली.

याप्रकरणी, केदारेश्‍वरनगर वानवडी येथील 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

दुसऱ्या घटनेत मुलीसोबत पायी चालत निघालेल्या एका शिक्षिकेच्या गळ्यातील 20 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसका मारून चोरुन नेली. याप्रकरणी, साळुंखे विहार वानवडी येथील 51 वर्षीय शिक्षिकेने फिर्याद दिली. त्यानुसार वानवडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही घटनादेखील सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेटे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.