पुणे – देशातील आयआयटी, नामवंत अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन परीक्षा दि.1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत होत आहे. पुण्यातील काही परीक्षा केंद्रांवर सुमारे 27 ते 28 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’द्वारे जेईई मेन्स परीक्षा घेतली जाते. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेली जेईई परीक्षा घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. मात्र, करोनाचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेऊन या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांनी केली होती. परंतु, केंद्र शासनाने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला नाही.
आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, “पुण्यातील रामटेकडी-हडपसर येथील इऑन डिजिटल झोन, सुयोग डिजिटल हब आणि नऱ्हे आंबेगाव येथील इऑन डिजिटल झोन एमसीबी बिझनेस सोल्युशन प्रा.लि.या परीक्षा केंद्रावर पुण्यात सुमारे 27 ते 28 हजार विद्यार्थी सहा दिवस टप्प्या-टप्प्याने परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळाल्यामुळे यंदा निकाल वाढण्याची शक्यता आहे.’