मुंबई – सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, याकरिता सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बॅंक विविध उपाययोजनेद्वारा एक लाख कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करणार आहे.
याअगोदरच रिझर्व बॅंकेने दहा हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे रोखे विकून लघु मुदतीचे रोखे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा आणखी एक व्यवहार पुढील पंधरवड्यात केला जाणार आहे. त्याचबरोबर बॅंकांनी जुन्या म्हणजे 5.15 टक्के या रेपो दरावर रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज घेतलेले आहे. रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकांना जुने कर्ज परत घेऊन सध्याच्या चार टक्के या रेपो रेटवर कर्ज घेण्याची मुभा दिली आहे.
त्यामुळे बॅंकांना कमी व्याजदरावरील भांडवल उपलब्ध होण्यास मदत होईल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. याचा तपशील पुढील आठवड्यात बॅंक सादर करणार आहे. गेल्याच आठवड्यात रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बॅंकेने परिस्थिती पाहून अनेक उपाययोजनांचे पर्याय खुले ठेवले असल्याचे सांगितले आहे.
रिझर्व्ह बॅंक इतर बॅंकांना रोख राखीव प्रमाणाच्या बदलातूनही काही प्रमाणात स्वस्त भांडवल उपलब्ध करणार आहे. मार्च महिन्यापासून रिझर्व्ह बॅंकेने अर्थव्यवस्थेला भांडवलाची चणचण भासू दिलेली नाही. आगामी वर्षातही असेच प्रयत्न चालू राहणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.