“एमएचआरडी’कडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी केंद्रीय स्तरावरील “नीट’ व आयआयटीसह नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली “जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. या प्रवेश परीक्षा जुलै महिन्यात न होता आता सप्टेंबरमध्ये होणार आहेत.
आता दोन्ही प्रवेश परीक्षांचे सुधारित वेळापत्रक “एमएचआरडी’ने प्रसिद्ध केले. त्यानुसार “जेईई मेन’ परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी, तर जेईई ऍडव्हान्स परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. तसेच “नीट’ परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल (निशंक) यांनी आज दिली.
देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने समिती नेमून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या समितीने करोना परिस्थितीचा आढावा घेत आज अहवाल दिल्यानंतर नीट आणि जेईई परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन ह्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही “नीट’ परीक्षा 26 जुलै, तर “जेईई मेन’ परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान, तर जेईई ऍडव्हान्स परीक्षा 23 ऑगस्ट रोजी होणार होती. या सर्व परीक्षा आता पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.