शिरुर -बाबुरावनगर येथील करोना बाधित मुलीच्या संपर्कात आलेल्या व वाढदिवस करणाऱ्या 15 पैकी 14 शाळकरी मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाबूरावनगरमधील या मुलींच्या इमारतीत राहणारा दहा वर्षीय मुलगा मुलींच्या संपर्कात आल्याने त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली. त्यामुळे शिरूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
गेल्या 24 तासांपासूनही जास्त काळ शिरूर शहरातील प्रत्येक नागरिक अहवालाची प्रतीक्षा करीत होता. यातील अनेक मुले शहरातील व्यापाऱ्यांची असल्याने नागरिकांना चिंता होती. शाळकरी मुलांनी साजरा केलेला वाढदिवस शहराच्या अंगलट येतो का काय, अशी भीती नागरिकांमध्ये होती. शहरात अफवांना उधाण आले होते. शिरूर येथील कोविड सेंटर येथून एकूण 23 जणांचे तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
केवळ बाबुरावनगर येथील बाधित मुलींच्या संपर्कात आल्याने मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शिरूर शहरातील पंधरा जणांची व तालुक्यातील कुरुळी, धामारी सणसवाडी येथील 8 नागरिकांचा समावेश होता.