लातूर – चाकुर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील जवान संभाजी केंद्रे यांचे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. जवान संभाजी केंद्रे हे भारतीय सैन्यदलात ते 17 वर्षांपासून कार्यरत होते. सध्या ते अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच केंद्रेवाडीसह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव लातूरला आणण्यात येत असून त्यांच्या मूळ गावी केंद्रेवाडी येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, जवान संभाजी केंद्रे हे गेल्या दोन वर्षांपासून अरुणाचल प्रदेशात सेवा बजावत होते. 13 जुलै रोजी रात्री 9 वाजता त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना 14 जुलैच्या दुपारी बाराच्या सुमारास त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
जवान संभाजी केंद्रे त्यांच्या 17 वर्षांच्या कार्यकाळात आतपर्यंत जम्मू काश्मीर, भोपाळ, श्रीनगर, अहमदनगर येथे सेवा बजावली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी भारतमातेची सेवा केली. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
जवान केंद्रे यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमदार धीरज देशमुख यांनी आदरांजली वाहिली. “आपल्या लातूर जिल्ह्याचे सुपुत्र, जवान संभाजी हरिबा केंद्रे (चाकुर) यांना अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. गेल्या 17 वर्षांपासून ते सैन्यदलात कार्यरत होते. या काळात देशसेवेसाठी त्यांनी केलेल्या कार्याला व त्यागाला सलाम! केंद्रे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत”, अशा भावना धीरज देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत. मूळ गावी केंद्रेवाडी येथे रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.