क्रिकेट काॅर्नर : बुमराह व शमीला अस्त्र म्हणून वापरा

– अमित डोंगरे

भारतीय संघाच्या कर्णधारांना मग ते कोणत्याही काळातील असोत कफ रोटेटर म्हणजे काय ते वेगळे सांगावे लागत नाही. जो गोलंदाज एखाद्या सामन्यात सातत्याने बळी घेतो, त्यालाच इतकी षटके गोलंदाजी देतात की त्याचा खांदा त्याला नाही म्हणायला सुरुवात करतो. कपिल देव यांच्यापासून सुरू असलेली ही परंपरा आता तरी बंद व्हायला हवी.

त्यामुळे जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांनी पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावाला खिंडार पाडले व कर्णधार विराट कोहलीने त्यांना मिळून डावातील 90 पैकी 40 षटके गोलंदाजी दिली. त्यांना हमाल म्हणून वापरू नका तर अस्त्र म्हणून वापरा.

एका कसोटीतच त्यांनी इतकी मोठी गोलंदाजी केली तर पुढील सामन्यांसाठी ते ताजेतवाने राहतील का याचा विचार व्हावा. मागे एकदा ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन कर्णधार स्टीव्ह वॉ याला विचारले गेले होते की, ग्लेन मॅकग्राने 5 गडी बाद केल्यावर संपूर्ण दिवसात त्याला पुन्हा गोलंदाजी का दिली नाही, तर तो म्हणाला संघात डॅमियन फ्लेमिंग, जेसन गिलेस्पी हे गोलंदाज आहेत, पण मॅकग्रा केवळ गोलंदाज नाही तर अस्त्र आहे. त्याला तसेच वापरले गेले पाहिजे तरच तो पुढील सामन्यांसाठी ताजातवाना राहील.

खरेच आहे त्याच्याच जोरावर किंवा त्याच्यासह शेन वॉर्नलाही जपून वापरत ऑस्ट्रेलियाने जागतिक क्रिकेटवर तब्बल दीड दशक वर्चस्व राखले. जर त्यांची ही मक्‍तेदारी भारताने मोडून काढली असे आहे तर मग आता कोहलीनेही स्टिव्ह वॉ याच्यासारखेच आपल्या प्रमुख गोलंदाजांना अस्त्र म्हणूनच वापरेल पाहिजे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात शमी व बुमराह यांनी अफलातून स्विंग गोलंदाजीचे प्रदर्शन केले व यजमान संघाची फलंदाजी उद्‌ध्वस्त केली. आता या संपूर्ण मालिकेत जर भारताला वर्चस्व राखत मालिका विजयाचा इतिहास लिहायचा असेल तर आपल्या भात्यातील अस्त्रे जपूनच वापरली पाहिजेत. या कसोटीच्या पहिल्या डावात ज्या पद्धतीने भारताच्या गोलंदाजांनी वातावरण व खेळपट्टीचा नेटाने अभ्यास केल्याचे त्यांच्या गोलंदाजीवरून दिसून आले आता या अभ्यासात खंड पडू नये हीच अपेक्षा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.