Tokyo Olympics : रवी दहियाने पटकावले रजतपदक

टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेत अखेर भारताच्या रवी दहियाला रजतपदकावर समाधान मानावे लागले. गुरुवारी झालेल्या अंतिम लढतीत रशियाच्या जावूून युगुयेवने रवीवर वर्चस्व गाजवताना 7-4 अशा फरकाने विजय मिळवला व सुवर्णपदकाला गवसणी घातली.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये एक रजत व तीन ब्रॉंझपदके मिळवलेल्या भारताला रवीकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाइल कुस्तीत रवीला अखेर पराभवाचा समना करावा लागला. रशिया ऑलिम्पिक समितीच्या युगुयेव याने रवीवर पहिल्या मिनिटापासूनच दडपण राखले.

रवीचा अनुभव काहीसा कमी पडला व त्याला रजतपदकावर समाधान मानावे लागले. युगुयेवने 2018 व 2019 सालची जागतिक स्पर्धा जिंकली होती. रशियावर निर्बंध असल्यामुळे त्याला रशिया ऑलिम्पिक समितीच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी व्हावे लागले. रवीला रजतपदक मिळाल्यामुळे ऑलिम्पिकच्या इतिहासात कुस्तीतील पदकांची एकूण संख्या सहा झाली आहे. सध्या एका खुनाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या सुशील कुमारने सलग दोन पदके जिंकली होती.

सुशीलने 2008 सालच्या बीजिंग स्पर्धेत ब्रॉंझ, तर 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रजतपदक जिंकले होते. योगेश्‍वर दत्तने 2012 साली ब्रॉंझ, साक्षी मलिकने 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक पटकावले होते. त्यापूर्वी खाशाबा जाधव यांनी 1952 सालच्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक जिंकले होते. आता रवीच्या रजतपदकासह एकूण सहा पदके या स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या कुस्तीपटूंनी पटकावली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.