नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये आज भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.याठिकाणी धरणावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन उलटले. या अपघातात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
किश्तवाड पोलिसांनी या अपघातविषयी माहिती दिली आहे. ही घटना डांगदुरु पॉवर प्रोजेक्टजवळ घडली. या प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन पलटी झालं. हा अपघात सकाळी 8.35 च्या सुमारास झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तर तीन जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इथे बचावकार्य सुरु आहे.
J&K | A cruiser vehicle of Pakal Dul Project with 10 people on board, met with an accident in Kishtwar, some feared dead. Further details awaited: DC Kishtwar pic.twitter.com/AAQICSgdhS
— ANI (@ANI) May 24, 2023
दुर्घटनेला किश्तवाड जिल्हा एसएसपी खलील पोसवाल यांनी दुजोरा दिला आहे. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १२ लोक जखमी झाले आहेत. अपघात झाला तो परिसर अतिशय दुर्गम आणि जिल्हा मुख्यालयापासून दूर आहे. मदत कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र हे सर्व मजूर स्थानिक असण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही ट्वीट करुन या घटनेची माहिती दिली आणि आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “डंगदुरु प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी अपघाताबाबत किश्तवाडचे डीसी डॉ. देवांश यादव यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी आहे. अपघातातील सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात किश्तवाड किंवा जीएमसी, डोडा इथे गरजेनुसार हलवण्यात येत आहे. जखमींना शक्य ती सर्व मदत केली जाईल. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.