नवी दिल्ली – चॉकलेट हे लहान मुलांना खूप आवडते, लहान मुले नेहमीच आई वडिलांकडे चॉकलेट खाण्यासाठी हट्ट करत असतात. मात्र उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे चॉकलेटमुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका चार वर्षाच्या निष्पापाचा त्याच्या पालकांसमोरच रुग्णालयात मृत्यू झाला. टॉफी मुलाच्या घशात अडकली होती, त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. पालकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
सानियाल नावाचा 4 वर्षांचा मुलगा रविवारी आजोबांकडून टॉफी घेण्यासाठी हट्ट करू लागला. यावेळी त्याला टॉफी घेण्यासाठी पैसेही दिले. पैसे घेऊन सानियालने जवळच्या दुकानात जाऊन स्वतःसाठी टॉफी विकत घेतली. सान्यालने घरी पोहोचून टॉफी खाताच ती घशात अडकली.
यावेळी त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलाची ढासळलेली प्रकृती पाहून पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मुलाला अजिबात बोलता येत नव्हता. डोळ्यातून फक्त अश्रू येत होते आणि त्याला वेदना होत होत्या. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यानच मुलाचा मृत्यू झाला. स्वत:च्या डोळ्यांसमोर मुलगा मरताना पाहून आई-वडील बेभान होऊन रडू लागले. या घटनेनंतर लहान मुलांना चॉकलेट देताना आई-वडिलांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.