जामखेड – जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात 2 किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. 18 एप्रिल रोजी जामखेड शहरात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात 1 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी 1 मे रोजी 12 रात्री वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांना प्रवेश देखील बंद करण्यात आला आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले आहे.
जामखेड शहरात सापडलेले चार करोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. या चारही व्यक्ती करोनामुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुढील चौदा दिवस जामखेड येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 10 ते 14 एप्रिलपर्यंत जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर यामध्ये वाढ दि. 23 एप्रिलपर्यंत हॉटस्पॉट वाढवले होते. दि 18 रोजी जामखेड येथील एका 70 वर्षीय व्यक्तीचा नगर येथे जिल्हा रुग्णालयात चार दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
त्याला करोना बाधा झाल्याच तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हॉटस्पॉटमध्ये वाढ करून दि 1 मे पर्यंत जामखेड शहर हॉटस्पॉट केले आहे.
जामखेड शहरासाठी कर्जतचे उपविभागीय अधिकारी हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. या क्षेत्रातील सर्व बॅंकांनी बॅंकिंग सुविधा बॅंक प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करुन द्याव्यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता बॅरिकेड्द्वारे खुला ठेवावा. अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत.