पुणे – शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या खोदाईचा फटका आता पालिकेलाच बसला आहे. मुख्य इमारतीसह, कमला नेहरू रुग्णालयाची इंटरनेट सेवा रविवारी सकाळपासून सोमवारी दिवसभरही बंदच होती. तातडीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांनी मोबाइलद्वारे इंटरनेट जोडत कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर, क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजालाही याचा फटका बसला. पालिकेस इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीकडन भूमिगत वाहिनीद्वारे जोडणी देण्यात आलेली आहे. अनेकदा रस्ते खोदाई तसेच अनधिकृत खोदाईमुळे या केबलचे नुकसान होऊन इंटरनेट सेवा बंद पडते. प्रामुख्याने पुणे स्टेशनच्या बाजूने ही वाहिनी आहे.
सर्व ऑनलाइन सेवा बंद
इंटरनेट बंद पडल्याने पालिकेतील ई-मेल, ऑनलाइन पेमेंट तसेच इंटरनेटवर आधारित सेवा बंद पडल्याचे दिसून आले. प्रामुख्याने राज्य तसेच केंद्र शासनाकडून महापालिकेस ई-मेलद्वारे तातडीची माहिती मागविली जाते. शिवाय, महत्त्वाचे पत्रव्यवहारही ई-मेलद्वारेच होतात. पालिकेतील बैठकांचे नियोजन तसेच वेळांचे वेळापत्रकही गुगल कॅलेंडररच निश्चित केले जाते. मात्र, इंटरनेट बंद असल्याने हे सर्व नियोजन कोलमडले. मिळकत करासह आणि जन्म-मृत्यू दाखल्यांच्या कामालाही फटका बसला.
सोमवारी सकाळपासूनच इंटरनेट सेवा बंद होती. काही ठिकाणी भूमिगत वाहिन्या तुटल्याने तसेच काही ठिकाणी राऊटर्समध्ये बिघाड झाल्याने ही स्थिती उद्भवली. मात्र, सायंकाळपर्यंत सर्व सेवा पूर्ववत करण्यात आली, असे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप म्हणाले.