पुणे – नागरिकांना एका क्लिकवर विविध सुविधा देण्यासाठी पालिकेने व्हॉट्सऍप “चॅटबॉट’ सुविधा सुरू केली आहे. दिवसाला या चॅटबॉटवर तब्बल 25 हजार पुणेकर वेगवेगळी माहिती तसेच सुविधा मिळवत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने यंदा तब्बल 12 लाख मिळकतकराची बिले या चॅटबॉट सुविधेवर नागरिकांना पाठवली आहेत.
मिळकतकर विभागप्रमुख डॉ. अजित देशमुख यांनी ही माहिती दिली. नागरिकांच्या शंकांचे निराकरण, तक्रारी, जवळच्या आरोग्य सेवांविषयी माहिती, विविध विभागाकडील नागरिकाभिमुख माहिती, जलदरित्या व सहजपणे नागरिकांना देण्यासाठी पालिकेने चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच प्रणालीचा वापर करत प्रॉपर्टी टॅक्स विभागाने मिळकत कराची 12 लाख बिले पाठवली आहेत. महापालिकेची जुनी हद्द तसेच 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या बिलांचा समावेश आहे. तर 23 गावांच्या बिलांचा समावेश पुढील वर्षापासून केला जाणार आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे इतक्या प्रमाणात ऑनलाइन सुविधेचा वापर पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
चॅटबॉटद्वारे आम्ही 12 लाख बिले पाठवली. यामुळे नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स भरणे सोयीचे होणार आहे. नागरिकांनी तत्काळ कर भरावा. तसेच महापालिकेच्या सवलतीचा लाभ घ्यावा. मिळकत कर वेळेत भरणाऱ्यांसाठी यंदा महापालिकेची बक्षीस योजनाही आहे. त्याची माहितीही या माध्यमातून देण्यात येत असून, प्रतिसादही मिळत आहे, असे कर आकारणी व कर संकलन विभागचे उपायुक्त्त अजित देशमुख उपायुक्त्त म्हणाले.
पुणेकरांचा मोठा प्रतिसाद
चॅटबॉट सेवेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मिळकत कर बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज 25-30 हजार नागरिक चॅटबॉट वापर करतात. तसेच काही शंका असल्यास कळवतात. यामुळे बिले भरण्याची संख्या देखील वाढली आहे. या शिवाय, इतर विभागांशी संबधित माहितीही नागरिक या सुविधेद्वारे घेत आहेत, अशी माहिती मनपाचे संगणक विभाग प्रमुख राहुल जगताप यांनी दिली.