मुंबई – कोरोना विषाणूचा वाढता फैलाव पाहत सध्या देशात गेल्या तीन महिन्यांहून अधिक दिवस झाले लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे देशात सर्वच काही ठप्प आहे. याचा फटका कलाविश्वाला देखील बसला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे शूटिंग बंद असून, सर्व कलाकार आपल्या घरातच बसून आहेत.
दरम्यान, चित्रीकरण बंद असल्याने गरजू कलाकार व तंत्रज्ञ यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्वांच्या मदतीसाठी आता बॉलिवूड अभिनेते ‘जॅकी श्रॉफ’ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
जॅकी श्रॉफ यांनी देखील जीवनावश्यक वस्तूंचे किट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांसाठी देऊन आपली सामाजिक बंधिलकी जपली आहे.
“सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अशावेळी एकमेकांना मदत करणे, मानसिक आधार देणे खूप गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीतील सगळ्यांना याचा त्रास झाला असला तरी यातील पडद्यामागील तंत्रज्ञ वर्गाला याचा विशेष फटका बसला आहे. त्यांना माझ्याकडून जास्तीत जास्त मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे”. अशा भावना जॅकी श्रॉफ यांनी बोलून दाखविली.