राज्य सेवा मुख्य परीक्षा : संकेतस्थळावर प्रसिद्ध
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सहापैकी चार विषयांचा अभ्यासक्रम सुधारित केला आहे. तो संकेतस्थळावर प्रसिद्ध केला असून, पुढील होणाऱ्या परीक्षेपासून लागू राहील.
राज्य शासनाच्या विविध विभागांतील गट-अ आणि गट-ब मधील प्रशासकीय पदांवर सक्षम उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेण्यात येते. यापैकी राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी एकूण सहा विषय असतात. त्यातील सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4 असे चार विषय असतात.
या चार विषयांचा अभ्यासक्रम सुधारित केला आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतील सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आला असून, इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम आणि अधिकृत समजण्यात येणार आहे.
उमेदवारांनी घ्यावयाची काळजी
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा या पदाच्या मुलाखती दि. 4 ते 21 ऑगस्ट यादरम्यान मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद व नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीस येणाऱ्या सर्व उमेदवारांनी कापडी मास्क, वैयक्तिक स्वच्छतेचे पालन, स्वत:चा सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राखावे, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत.