मेलबर्न – क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच विश्वकरंडक स्पर्धा यंदा 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळविली जाणार आहे. 2023 च्या वनडे विश्वकरंडकासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमिवर इंग्लंडच्या एकदिवसीय संघात नाट्यमय घडामोडी घडल्या.
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या इंग्लंडचा 32 वर्षीय स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने आपला निर्णय मागे घेताना सर्वांनाच आश्चर्यचकित केले. एवढेच नाही तर त्याने माघार घेतल्यानंतर इंग्लंडच्या वनडे संघातही त्याची निवड झाली.
खरंतर स्टोक्सने गेल्या वर्षी जुलैमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतू त्याच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने “स्टोक्स अशा स्वार्थीपणे आवडीने स्पर्धा निवडू शकत नाही. त्याची भूमिका इथे फक्त मी आणि मीच आहे अशी आहे’, असे म्हणत जोरदार टीका केली आहे.
सेन रेडिओवर बोलताना पेन पुढे म्हणाला, आधी स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मला कुठे खेळायचे आहे आणि कधी खेळायचे आहे ते मी निवडेन आणि मला फक्त मोठ्या स्पर्धांमध्येच खेळायचे आहे, अशी स्टोक्सची स्वार्थी भूमिका आहे.
परंतू मला चिंता गेल्या 12 महिन्यांपासून जे इंग्लंडचे क्रिकेटपटू विश्वकरंडकाची तयारी करत आहेत त्यांची आहे. कारण, त्यापैकी कोणालाही स्टोक्सच्या पुनरागमनामुळे संघाबाहेर बसावे लागेल.
आपल्या स्वार्थीपणासाठी स्टोक्स ज्यापद्धतीने अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरत आहे ते अत्यंत दुर्देवी आहे. मला त्या खेळाडूंबद्दल वाईट वाटते.
इंग्लंड व भारत प्रबळ दावेदार
पेनने पुढे बोलताना विश्वकरंडाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या संघांची नावेही सांगितली. तो म्हणाला, गतविजेता इंग्लंड यजमान भारतासह जेतेपदाचे दावेदार म्हणून वनडे विश्वकरंडक स्पर्धेत उतरेल. माझा विश्वास आहे की ऑस्ट्रेलियानेही चांगले क्रिकेट खेळले तर तेही विश्वकरंडकही जिंकू शकतात.