नवी दिल्ली : चीननंतर इटलीला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला असून बुधवारी एकाच दिवसात 475 जणांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात करोनामुळे एका दिवसात इतके बळी गेल्याची जगातील ही पहिली घटना आहे. दुर्दैवाने याआधीही एका दिवसात सर्वात जास्त बळी गेल्याची घटनाही इटलीतच घडली होती. त्यावेळी एका दिवसात 368 जणांचा मृत्यू झाला होता.
चीननंतर कोरोनाचा सर्वात जास्त कहर इटलीत झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत इटली चीनच्या जवळ पोहोचला आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, इटलीत मृत्यूमुखीत पडलेल्यांची संख्या 2978 झाली आहे तर लागण झालेल्यांची संख्या 34173 आहे. यामधील 2257 जणांची प्रकृती गंभीर आहे. इटलीत उपचारानंतर 4205 जणांची प्रकृती सुधारली आहे. दुसरीकडे चीनबद्दल बोलायचे गेल्यास करोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. चीनमध्ये 80 हजार 884 जणांना करोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा 3237 वर पोहोचला आहे.
इटलीत लॉकडाऊन करण्यात आलेले असून लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून तीन फुटांचे अंतर ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालये, रेस्तरॉं, चित्रपटगृहे बंद करण्यात आलेली असून लोकांना घरातच थांबवण्यास सांगण्यात आलेले आहे. इटलीत लाखो लोक आपल्या घरातच थांबलेली आहेत.
जगभरात करोना मृतांची संख्या आता 8082 झाली असून त्यात युरोपात 3422 तर आशियात 3384 जण मरण पावले आहेत. जगात एकूण 2 लाख 620 लोकांना संसर्ग झाला आहे. आशियातील मृतांच्या संख्येपेक्षा युरोपातील मृतांची संख्या अल्पावधीतच जास्त झाली आहे. 24 तासांत 684 जणांचा मृत्यू झाल्याने युरोपातील संख्या वाढली. युरोपात एकूण 77,766 जणांना संसर्ग झालेला आहे. स्पेनमध्ये मृतांची संख्या 600 झाली असून संसर्ग झालेल्यांची संख्या 13,700 झाली आहे. 24 तासांत 107 जणांचे मृत्यू होऊन एकूण आकडा 598 झाला. माद्रिद शहर बंद असून तेथे 5,637 जणांना लागण झाली आहे. तेथे तपासणी संचांची कमतरता आहे.