अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांची कव्हर गर्ल बनलेली बहुचर्चित मॉडेल आणि अभिनेत्री डायना पेंटी ही सध्या एका नव्या जोमाने बॉलीवूडमध्ये सक्रिय झाली आहे. निर्माते दिनेश व्हिजन यांच्या “शिद्दत’ या, कुणाल देशमुख दिग्दर्शित चित्रपटात ती एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने डायनाशी बराच काळ बाचतीचत केली. डायना सांगते, हा एक प्युअर रोमॅंटिक चित्रपट आहे. यामध्ये मी करिश्मा नावाच्या एका मॉडर्न युवतीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या कॅरेक्टरला अनेक शेडस् आहेत. हल्ली मी अशाच प्रकारच्या भूमिकांना प्राधान्य देते, असे ती सांगते. 2012 मध्ये “कॉकटेल’ या चित्रपटापासून डायनाची सिनेकारकीर्द सुरू झाली.
डायना सांगते “मी याबाबत कमनशिबी आहे. “कॉकटेल’ या पहिल्या चित्रपटापासन ते “परमाणू’, हॅप्पी फिर भाग’ या चित्रपटांपर्यंतच्या बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये माझ्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली, पण मला त्याचा फायदा उठवता आला नाही.
अर्थात, मीही माझ्याकडे आलेल्या चित्रपटाच्या प्रस्तावांसाठी कोणतीही तडजोड केली नाही. जे चित्रपट स्वीकारले त्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी मी अभिनय केला. असे ती सांगते. हे सांगतानाच डायना म्हणते, मी अभिनयाच्या क्षेत्रात येणारच नव्हते. मॉडेलिंगमध्ये मी खूप खुश होते. योगायोगाने मला ऑफर आली आणि मी इकडे वळले, पण आता सिनेसृष्टीत आलेच आहे तर सहजासहजी हा रस्ता सोडून जाणार नाही !