मिलान : जागतिक फुटबॉलचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपला फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध करताना टोरीनोवर युवेन्ट्सला 4-1 असा मोठा विजय मिळवून दिला.
करोनाचा धोका कमी झाल्यानंतर इटलीत सुरू झालेल्या इटालियन लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात रोनाल्डोने संघाच्या 4 गोलमध्ये आपल्याही एका गोलचा वाटा उचलला. अर्थात अन्य तीनही गोलपेक्षा रोनाल्डोने केलेला फ्री कीकवरचा गोल सर्वात प्रेक्षणिय होता.
हा सामना सुरू झाल्यानंतर पाऊलो देबालाने तिसऱ्याच मिनिटाला युवेन्ट्सकडून पहिला गोल केला व शानदार सुरुवात केली. त्यानंतर ऍण्ड्री बेलोटीने टोरीनोकडून गोल करत सामन्यात बरोबरी साधून दिली. पहिल्या हाफमधील ही वाढीव मिनिटे होती. दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर ज्युआन कॉड्रेडो याने 61 व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला. यावेळी युवेन्ट्सकडे 2-1 अशी आघाडी होती.
यानंतर मात्र, सबकूछ रानोल्डो असेच चित्र दिसले. त्याने संघाचा तिसरा व स्वतःचा या सामन्यातील पहिला गोल करताना संपूर्ण टोरीनो संघावर वर्चस्व राखले. त्यावेळी त्याला फ्री कीक मिळाली व एक अफलातून गोल एका स्टार खेळाडूकडून पाहायला मिळाला.
रोनाल्डोनंतर कोफी जीजेड याने सामना संपण्यास काहीच मिनिटे शिल्लक असताना 87 व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल नेंदवला. यानंतर युवेन्ट्सने टोरीनोला गोलची एकही संधी मिळून दिली नाही. हा सामना जिंकून युवेन्ट्सने या स्पर्धेच्या गुणतालिकेत अग्रस्थान मिळवताना 30 सामन्यातून 75 गुणांची नोंद केली.