‘उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री राज्याला मिळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव’

नारायणे राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई – हात धुवून मागे लागेन अशी धमकी त्यांनी दिली आहे ती नेमकी कशाच्या जीवावर दिली आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्ध्वस्त करणाऱ्या मार्गावर जाऊ नये विकासाच्या मार्गावर जावे, असा सल्ला भाजप नेते नारायण राणे यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशीही टीका नारायण राणेंनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त उद्धव ठाकरेंनी सामनामध्ये दिलेल्या मुलाखतीवर नारायण राणेंनी कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले कि, नाचता येईना अंगण वाकडे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था आहे. हे सरकार तीन पक्षांचे सरकार आहे. जनतेशी गद्दारी करुन आलेले हे सरकार असून फार काळ टिकणार नाही. तसेच, या सरकारने ६५ हजार कोटींचे कर्ज मागील सहा महिन्यात काढले असून राज्याला दिवाळखोरीत नेले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने नव्हते, त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षणाला समर्थन दिले नाही. सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील नेमण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकले आहेत. ते कार चालवतात याचे संजय राऊत कौतुक करतात. मात्र महाराष्ट्राला ड्रायव्हर नको सक्षम मुख्यमंत्री हवा आहे. तीन पक्षांचे सरकार  महाराष्ट्राच्या हिताचे नाही. त्यामुळे हे सरकार जाण्यासाठी जर कुणी प्रयत्न केले तर ते मी गैर मानणार नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.