कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत साशंकता

सूर्यकांत पाटणकर

भारनियमन व पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागण्याची भीती

मागील वर्षी आजच्या दिवशी  कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्यावर्षी मुसळधार पाऊस पडत होता. आजच्या दिवशी गेल्यावर्षी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून सुमारे 23 हजार 714 क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात होता. पाणीसाठा 83.50 टीएमसी एवढा होता तर धरणात प्रतिसेकंद 28 हजार क्‍यूसेक पाण्याची आवक होत होती. तर आज रोजी 9283 क्‍यूसेक्‍स पाण्याची आवक होत आहे.

पाटण – राज्याच्या सिंचन व वीज निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आसणारे कोयना धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरेल का नाही अशी साशंकता निर्माण झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने ऐन जुलै महिन्यात उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची स्थिती अशीच राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता धुसर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राज्याला भारनियमन व पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

कोयना धरणाची 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असून धरणाच्या पाण्याचा वापर महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांच्या सिंचनासाठी व राज्याची वीजेची गरज भागविण्यासाठी होतो. एक जून ते 31 मे असे जलवर्ष आसणाऱ्या कोयना धरणातील पाण्याचा 67.50 टीएमसी पाण्याचा वापर पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी केला जातो. तर पूर्वेकडील सिंचनासाठी 29 टीएमसी पाणी वापरले जाते. तर उर्वरित पाणी राखीव म्हणून शिल्लक ठेवले जाते. यावर्षी पावसाने उशिरा सुरवात केल्याने सुरवातीचा जून महिना कोरडा गेला तर जुलैच्या सुरवातीस  पावसाने दमदार हजेरी लावली होती. यावेळी सुमारे प्रतिसेकंद 50565 क्‍युसेक पाण्याची आवक धरणात एका दिवसात झाली होती. मात्र, नंतर पावसाने उघडीप दिल्याने धरणातील येणाऱ्या पाण्याची आवक कमी होत गेली.

सध्या कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. सध्या कोयना पाणलोट क्षेत्रात कोयना, नवजा व महाबळेश्‍वर याठिकाणी पडणाऱ्या पावसाची नोंदही फार कमी आहे. चोवीस तासांत केवळ 30 ते 40 मिलीमिटर पावसाची नोंद होत आहे. मात्र, कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी कोयना, नवजा व महाबळेश्‍वर याठिकाणी अनुक्रमे 200 ते 250 मिलिमीटर पाऊस पडणे गरजेचे आहे. आजपर्यंत एक जून ते आजअखेर एकूण पावसाची नोंद कोयना 2293, नवजा 2639, महाबळेश्‍वर 2265 मिलिमीटर एवढी झाली आहे तर गतवर्षी यावेळी कोयना 3315, नवजा 3396, तर महाबळेश्‍वर 3007 मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावेळी सरासरी 1000 मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. याचा परिणाम कोयना धरणातील पाणी साठ्यावर झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.