चोरीच्या संशयाने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न साडे तीन वर्षे सक्तमजुरी
सातारा – गावातील मंदिरात चोरी केल्याच्या संशयावरून मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला न्यायालयाने साडेतीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.गणेश दीपक गडकरी (रा. जकातवाडी, ता. सातारा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुनील विठ्ठल शिळमकर (रा. जकातवाडी ता.जि.सातारा) यांनी 2016 मध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्यात गणेश दीपक गडकरी, प्रवीण दीपक गडकरी, नितिन प्रकाश जाधव, धीरज अशोक चव्हाण, सुरज अशोक चव्हाण (सर्व रा. डबेवाडी ता.जि.सातारा) यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंदिरात चोरी केल्याच्या संशयावरून तक्रारदाराला यातील संशयितांनी मारहाण केली होती. त्यानंतर गणेश गडकरी याने त्याच्या दुचाकीतील पेट्रोल काढून तक्रारदाराच्या अंगावर ओतून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तक्रारदाराने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी शिळमकर यांच्या तक्रारीवरून संशयितांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एच. डी. साठे, हवालदार संतोष कदम, सुजीत भोसले यांनी तपास करून संशयितांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान झालेल्या 11 साक्षी, पुरावे तसेच सरकारी वकील एन. डी. मुके यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी आरोपी गणेश गडकरी याला साडेतीन वर्षे सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून शुभांगी भोसले, शुभांगी वाघ यांनी काम पाहिले.