मुंबई :- कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यामुळेच क्लीनचिट मिळाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “माझ्यावर होत असलेला आरोप हा अत्यंत हास्यास्पद आहे, प्रकाश आंबेडकर यांनी असे खोटे आरोप करणं योग्य नाही.” असे उत्तर दिले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, “माझ्यावर होत असलेला आरोप हा अत्यंत हास्यास्पद आहे. माझा संभाजी भिडेंसोबत कोणताही संबंध नाही. त्यांना नेमकी कोणत्या प्रकरणात क्लीनचीट मिळाली हे ही मला माहिती नाही. त्यांनी कधीही माझ्याकडे येऊन मदत देखील मागितलेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी असे खोटे आरोप करणं योग्य नाही. त्यांच्याकडे काही पुरावा असेल तर तो त्यांनी सादर करावा, असे आव्हान देखील जयंत पाटील यांनी यावेळी दिले.