जीनिव्हा – करोना विषाणू येथे किती काळापर्यंत राहू शकेल आणि जगभर पसरलेली ही साथ कधी नियंत्रित होऊ शकेल, हे सांगणे अशक्य आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन प्रमुखांनी सांगितले.
कोणत्याही औषधाविना हा विषाणू नाहीसा होणार नाही. मानवामध्ये या विषाणूविरोधातील रोग प्रतिकार क्षमता निर्माण होण्यास अनेक वर्षे लागू शकतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन प्रमुख डॉ. मायकेल रेयान यांनी सांगितले.
हा विषाणू साथीचा रोग पसरवणारे आणखी एक निमित्त ठरू शकतो. यापूर्वी अस्तित्वात आलेला एचआयव्ही सारखा विषाणू अजूनही नष्ट होऊ शकलेला नाही. मात्र, परिणामकार उपचारांमुळे या विषाणूच्या प्रादुर्भावानंतरही दीर्घकाळापर्यंत व्यक्ती जिवंत राहू शकते.
मात्र, करोनावर परिणामकारक औषध निश्चित शोधले जाऊ शकेल, अशी आशा डॉ. रेयान यांनी व्यक्त केली. तरीही त्यासाठी खूप काम करावे लागेल. लोकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे औषध जगभर वितरित करावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यामध्ये अनेक आव्हाने आहेत, असेही डॉ. रेयान यांनी सांगितले.