आयपीएलमधील संघांमध्ये वाढ कठीणच

वेळ कमी असल्याचे बीसीसीआयचे मत

मुंबई  – आयपीएल स्पर्धेत पुढील वर्षी संघांच्या संख्येत वाढ होण्याचे संकेत मिळाले होते. मात्र, पुढील वर्षी मार्चमध्ये होणार असलेल्या स्पर्धेत संघांत वाढ होणे कठीण असल्याचे मत बीसीसीआयनेच व्यक्त केले आहे.

स्पर्धेला केवळ चार महिन्यांचा कालावधी असून इतक्‍या कमी वेळात नवे संघ, लिलाव, सामन्यांची ठिकाणे यांसह करोनाची परिस्थिती कायम राहिल्यास स्पर्धेचे आयोजन कुठे करायचे हे ठरवण्यासाठीच मुळात वेळ कमी आहे. मग अशा स्थितीत संघांच्या संख्येत वाढ करणे शक्‍य होणार नाही, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

करोनाच्या धोक्‍यामुळे यंदाची स्पर्धा भारताएवजी अमिरातीत घेण्यात आली होती. मात्र, पुढील वर्षीची स्पर्धा भारतातच होणार असे त्यावेळी बीसीसीआयने सांगितले होते. आता स्पर्धा जरी देशातच होणार असली तरीही नवे संघ या स्पर्धेत दिसण्याची शक्‍यताच जवळपास संपुष्टात आली आहे.

आयपीएल हे भारतामध्येच आयोजित करण्याचा विचार जरी बीसीसीआय करत असली तरीही स्पर्धेसाठी कमीत कमी केंद्रे तयार करावी लागतील तसेच बायोबबल सुरक्षाही करावी लागणार आहे.
पुढील वर्षी दोन नव्या संघांना स्पर्धेत सहभागी करून देण्यासाठी खूप कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

निविदा काढणे, खेळाडूंचा लिलाव आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेच्या आयोजनाशी निगडित सर्व घटकांची यासाठी संमती मिळवणे हेच मोठे आव्हान आहे. अशा स्तितीत इतक्‍या कमी कालावधीत या गोष्टी पूर्ण होणे कठीण आहे. 2022 च्या मोसमात याबाबत निर्णय होऊ शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नवा प्रक्षेपण करार होणार …..

आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या स्टार समुहाशी बीसीसीआयचा करार केवळ पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेपुरताच आहे. त्यामुळे 2022 साली बीसीसीआयला सामन्यांच्या प्रक्षेपणाच्या हक्कासाठी नव्याने निविदा काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे 2022 साली नवीन संघांना संधी देण्याचा निर्णय झाला तर नव्या समुहाशी करार करण्यासाठी जास्त वेळ हाती असेल व त्यावेळीच दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. याबाबतचा प्रत्येक निर्णय बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतच घेतला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.