Israil-Hamas war : आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि हमासच्या युद्धाचा आता जगावर परिणाम होताना पाहायला दिसून येत आहे. कारण या युद्धात अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. यात लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी काळजी व्यक्त करत मोठे वक्तव्य केले आहे. “गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे”, असे स्पष्ट मत अँटोनियो गुट्रेस यांनी व्यक्त केले आहे.
इस्रायल आणि हमासच्या युद्धाविषयी बोलताना गुट्रेस म्हणाले,“गाझातील युद्ध हे केवळ माणसावरील संकट नाही, तर त्यापेक्षाही अधिक मोठं आहे. हे मानवतेवरील संकट आहे. या युद्धाच्या प्रत्येक तासानंतर युद्धविरामाची गरज वाढत असून तातडीने युद्धविराम केला पाहिजे.”असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना गुट्रेस यांनी,“या युद्धामुळे मोठ्या समुदायाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे गाझात मोठ्या प्रमाणात माणुसकीच्या नात्याने मोठी मदत करणं गरजेचं आहे. यासाठी युद्धातील दोन्ही पक्ष आणि आंतरराष्ट्रीय समुदायावर युद्धविरामाची मुलभूत जबाबदारी आहे,” असेही गुट्रेस यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, या युद्धामध्ये आतापर्यंत १०,३२८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ४,२३७ मुलांचा समावेश आहे अशी माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. दुसरीकडे गाझा पट्टीमध्ये इंधनाचा पुरवठा झाला नाही तर सर्व सेवा कोलमडून पडतील असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदत कार्यालयाकडून देण्यात आला आहे. गाझा पट्टीत आतापर्यंत मदत आणि वैद्यकीय सामग्री घेऊन ५६९ ट्रक आले आहेत. मात्र त्यामध्ये इंधनाचा समावेश नाही. इंधनाचा वापर हमासच्या अतिरेक्यांकडून केला जाईल असे कारण देत इस्रायलने गाझामध्ये इंधनपुरवठा रोखून धरला आहे.