नवी दिल्ली – हिज्बुल्लाहकडून इस्रायलवर केले जात असलेल्या मार्याला इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर हिज्बुल्लाहविरोधात दुसरे युद्ध सुरू होईल, असा इशाराही इस्रायलने दिला आहे. लेबेनानची राजधानी बैरुतमध्ये हमासच्या वरिष्ठ म्होरक्याला इस्रायलने लक्ष्य केल्यापासून इस्रायल आणि लेबेनानमधील दहशतवादी संघटना हिज्बुल्लाहमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल आहे.
उत्तर इस्रायलमधील हवाई नियंत्रण कक्षाला हिज्बुल्लाहने लक्ष्य केले असल्याचे इस्रायलच्या सैन्याने रविवारी म्हटले होते. त्यानंतर हा इशारा देण्यात आला. इराणच्या पाठिंब्यावर लेबेनानमधून कार्यरत असलेल्या हिज्बुल्हने माऊंट मेरोनच्या तळावरही मारा केला .
मात्र या मार्याचा इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर काही परिणाम झाला नाही, कारण इस्रायलकडे पर्यायी व्यवस्था होती आणि इस्रायलच्या एकाही सैनिकाला कोणतीही इजा झाली नाही, असेही इस्रायलने म्हटले आहे.
हमासविरोधात इस्रायलचे युद्ध सुरू असताना हिज्बुल्लाहने केलेला हा आताप्रयंतचा सर्वात मोठा मारा होता, असे इस्रायलने म्हटले आहे. हिजबुल्लाहवर दबाव वाढत आहे आणि तो एकतर प्रभावी होईल किंवा आम्ही दुसरे युद्ध करू, असे इस्रायली लष्करी प्रमुख लेफ्टनंट कर्नल हर्झी हालेवी यांनी म्हटले आहे. हमासविरोधात इस्रायलने केलेल्या कारवाईपासून हिज्बुल्लाहने धडा घ्यावा, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू अलिकडेच म्हणाले होते.