जेरूसलेम (इस्राइल) – पॅलेस्टाईन भूभागातून इस्राइली हद्दीमध्ये दोन रॉकेट डागली गेल्यानंतर इस्राइलने गाझा पट्टयातील हमासच्या ठिकाणांवर जोरदार मारा करायला सुरुवात केली आहे. इस्राइलच्या फौजांच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि रणगाड्यांनी हमासच्या भूमिगत बंकर आणि लष्करी चौक्यांवर मारा केला असल्याचे इस्राइलच्या सैन्याने सांगितले. दोन रॉकेट्स इस्राइलमध्ये डागण्यात आली होती, त्यापैकी एक अश्दोद या दक्षिणेकडील इस्त्रायली शहरावर आणि दुसरे मध्य इस्त्राइलमअध्ये पडले होते.
ही रॉकेट खुल्या भागात पडली असल्याचे सैन्य दलाने सांगितले. या रॉकेट हल्ल्यात आणि त्यानंतरच्या इस्राइलच्या माऱ्यात् दोन्ही बाजूंकडील कोणीही जखमी झाल्याची कोणतीही माहिती त्वरित उपलब्ध झाली नाही. या हल्ल्याबाबत हमासकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
इस्राइल आणि हमास दरम्यान 2007 पासून तीन युद्धे झाली आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक लहान धुमश्चक्रीही झाल्या आहेत.