नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसह सार्वजनिक स्वरूपात येथील प्रख्यात अक्षरधाम मंदिरात महालक्ष्मी पुजन केले.
या सोहोळ्याचे अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यांनी स्पॉन्सर्ड प्रोग्रॅम च्या आधारे थेट प्रक्षेपण घडवले आणि संपुर्ण दिल्लीकरांना त्यात त्यांनी सहभागी करून घेतले. या पुजा कार्यक्रमाचे संयोजनही अत्यंत देखणे आणि नेटक्या स्वरूपात करण्यात आले होते.
मुख्यमंत्री केजरीवाल, आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सपत्नीक ही पुजा करतानाच आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना त्यांनी उपस्थित ठेवले होते. शास्त्रोक्त पुजा विधी, नंतर झालेल्या आरतीचे देखणे आयोजन आणि आरती म्हणण्यासाठी खास पाचारण करण्यात आलेले भजन गायक अनुप जलोटा आणि अणि दिव्यांच्या आराशीसह आरतीत सहभागी झालेल्या तरूण तरूणींमुळे हा सोहोळा आकर्षक ठरला.
केजरीवालांनी त्यासाठी आठ दिवस आधी सर्व महत्वाच्या वाहिन्यांवर दोन कोटी दिल्लीकरांची एक परिवार म्हणून महालक्ष्मीपुजा करण्यात येत असल्याचे आवाहन केले होते. सर्वांनी एकत्रित पुजा करण्यासाठी त्यांनी 7 वाजून 39 मिनीटांचा मुहुर्तही निश्चीत केला होता.
अक्षरधाम मंदिराच्या पुजाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने ही पुजा केली. या विधीचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने त्यानुसार अनेकांनी घरात तशाच प्रकारची पुजा केली. केजरीवालांकडून प्रथमच अशा स्वरूपाच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोंजन करण्यात आले होते.