नवी दिल्ली – दिल्लीत करोनाची स्थिती पुन्हा गंभीर होऊ लागली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज या शहरातील करोना स्थितीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला.
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन, दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, आणि अन्य वरीष्ट सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. दिल्लीत आता पुन्हा नव्याने तीन ते चार हजार रूग्ण आढळून येत आहेत.
बुधवारी तेथे एकाच दिवशी 8593 कोविड रूग्ण आढळून आले होते. तेथे सध्या एकूण 44 हजार 456 ऍक्टिव्ह केसेस आहेत. करोना नियंत्रण कक्षाने दिल्लीत आता दररोज किमान पंधरा हजार रूग्ण बाधित होण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील करोनाचा हा तिसरा फेरा आहे असे सांगितले जात आहे.
त्यामुळे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांनी एकत्रितपणे पुन्हा या स्थितीचा सामना करण्यासाठी पावले उचलायचा निर्णय घेतला आहे. या आधीही अमित शहा यांनी दिल्लीच्या स्थितीबाबत हस्तक्षेप करून तेथील पायाभूत वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ केली होती.
आजही त्यांनी दिल्लीसाठी 12 कलमी कार्यक्रम जाहीर केला असून चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याबरोबरच आयसीयु बेड मध्येही वाढ करण्याचा निर्णय अमित शहांनी घेतला.