Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. हमासने पहिल्यांदाच गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या २० हुन अधिक लोकांची सुटका केली आहे. तर त्या मोबदल्यात इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका केली असल्याची माहिती समोर येत आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या करारानुसार ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत १५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात मृतांची संख्या 1200 च्या आसपास आहे.
हमासने इस्रायलवर हल्ला केला तेव्हा सुमारे 250 लोकांचे अपहरण करण्यात आले होते. या सर्व ओलीसांची सुटका करण्यासाठी इस्रायल काम करत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा पट्टीतील युद्ध चार दिवस थांबवण्यासाठी करार झाला आहे. या करारानुसार शुक्रवारपासून चार दिवस गाझामध्ये बॉम्बस्फोट होणार नाहीत. त्या बदल्यात हमास चार दिवसांत ५० ओलिसांची सुटका करेल, तर इस्रायल तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनींची सुटका करणार आहे.
हमासने या करारानुसार 24 ओलिसांची सुटका केली, ज्यात 13 इस्रायली, 10 थाई आणि 1 फिलिपिनो नागरिकांचा समावेश आहे. त्या बदल्यात इस्रायली तुरुंगात कैद असलेल्या 39 पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्यात आली. इस्रायलच्या तुरुंगात सुमारे 8300 पॅलेस्टिनी कैदी आहेत.
युनायटेड नेशन्सने म्हटले आहे की, युद्ध थांबल्याच्या पहिल्या दिवशी मानवतावादी मदत असलेले 137 ट्रक गाझाला पाठवण्यात आले आहेत. शुक्रवारपासून गाझामध्ये १.३ लाख लिटर डिझेल आणि चार ट्रक गॅसची आवक सुरू होणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर गाझाला पोहोचलेली ही सर्वात मोठी मदत समजली जात आहे.