बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. तसेच अनुपम खेरच्या कुटुंबातही 4 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर अनेक अफवांना उत आला आहे. यामुळे बॉलीवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनीच्या मुलीने एक ट्विट करत त्यांचे हेल्थ अपडेट जारी केले आहेत.
सोशल मीडियावर काही गोष्टी मोठया प्रमाणात व्हायरल होतात. यात ज्येष्ठ हेमा मालिनीची प्रकृती ठिक नसल्याची चर्चा होती. ही अफवा असल्याचे त्यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलने स्पष्ट केले आहे. ईशाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझी आई हेमा मालिनी यांची प्रकृती एकदम ठणठणीत असून त्या खुशाल आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त खोटे आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सर्वांच्या प्रेम आणि आपुलकीबाबत धन्यवाद!
दरम्यान, यापूर्वी करण जोहर आणि नीतू कपूर यांना करोनाचा संसर्ग झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, ऋद्धिमा कपूरने ट्विट करत त्या वृत्ताचे खंडन केले होते. तसेच आपली आई आणि कुटुंबिय ठिक असल्याची माहिती दिली होती.