नारायणगाव – जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपकेंद्रात सोमवार (दि. 13) पासून टोमॅटो व भाजीपाला मार्केट सुरू राहणार असल्याची माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.
नारायणगाव उपबाजार केंद्रात जुन्नर, आंबेगाव, खेड, पारनेर, संगमनेर तालुक्यातून टोमॅटो विक्रीसाठी येत असतात. सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमध्ये पणन महामंडळ व राज्य शासनाने शेतीमालावर बंदी घातली नसल्याने शेती मालाची आवक-जावक सुरू ठेवली आहे.
ग्रामीण भागात शेती हेच आर्थिक स्त्रोत असल्याने व शेतीचा माल नाशवंत असल्याने शेतीमाल पुरवठा सुरूच राहणार असल्याची माहिती काळे व संचालक विपूल फुलसुंदर यांनी दिली. दरम्यान, यासाठी सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.