सिनेमा, मालिका, नाटक आणि एकंदरीतच मनोरंजनाचं क्षेत्र हे प्रचंड अनिश्चिततेनं भरलेलं असतं. इथं कधी कुणाचं नशीब फळफळेल सांगता येत नाही, तसंच पाहता पाहता कुणी कधी विस्मरणात जाईल हेही सांगता येत नाही. त्यामुळेच की काय आघाडीच्या कलाकारांनाही बरेचदा आपण इनसिक्युअर वाटताना दिसतं. वरुण धवनबाबतही तसंच घडतंय.
सध्या वरुण “कुली नंबर 1’च्या आगामी रिमेकपटाच्या तयारीत व्यस्त आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो “मिस्टर लेले’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत दिग्दर्शक शशांक खेतान याने एक टिपणी केली होती. कलाकारांच्या तारखा मिळत नसल्यामुळे चित्रपट सध्या स्थगित केला आहे, असे त्याने म्हटले होते.
तसेच मी आणि वरुण लवकरच मिस्टर लेले किंवा एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसू, असेही तो म्हणाला होता. त्यामुळे वरुणला या चित्रपटातून डच्चू मिळाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्यावर वरुणने “वा काय नवी बातमी दिलीय! मी ही बातमी ऐकून ऐकून कंटाळलो’ अशी प्रतिक्रिया दिली. वरुणचा “स्ट्रीट डान्सर 3डी’ हा चित्रपट साफ आपटला होता. अशा वेळी “मिस्टर लेले’ त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. पण त्याबाबतही अनिश्चितता दिसू लागल्यामुळे वरुण बहुधा इनसिक्युअर फील करत आहे.