नवी दिल्ली – करोना विषाणूंमुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीत ज्या लोकांना अन्नधान्य देखील मिळत नसल्याचे समोर आल्यावर क्रिकेटपटू इरफान पठाण व त्याचा भाऊ क्रिकेटपटू युसुफ पठाण यांनी स्थानिकांना मदतीचा हात दिला. प्रथम मास्कचे वाटप केल्यानंतर लोकांना अन्नधान्य पुरविण्यासही सुरुवात केली. मात्र, तरीही त्यांना सोशल मीडियावर टीकेचे धनी व्हावे लागले.
रविवारी( 5 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दीपोत्सव करण्याचे आवाहन केले होते. यावेळी काही लोकांनी फटाके फोडले होते. या कृतीवर अनेक स्तरांतून टीका झाली. पठाण बंधूंनीही फटाके वाजविणाऱ्यांवर टीका केली होती. त्यावर नेटकऱ्यांनी पठाणबंधूंवरच ताशेरे ओढले आहेत. लोकांनी आनंद व्यक्त केला त्याचा तुम्हाला का राग येतो. फटाके वाजविणे ही आनंद व्यक्त करण्याची लोकांची पद्धत आहे, असे उत्तर नेटकऱ्यांनी दिले आहे.
करोनाबाधितांच्या मदतीसाठी पुढे येऊन पठाण बंधूंनी प्रथम मास्कचे वाटप केले. त्यानंतर गरजूंना मदत म्हणून 10 हजार किलो तांदूळ तसेच 700 किलो बटाट्यांचेही वाटप केले. तरीही त्यांना ट्रोल केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री 9 वाजता सर्व देशवासियांना घरातील दिवे बंद करून दीपोत्सव करण्याचे आवाहन केले होते. यावेळी लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. मात्र, काही लोकांनी फटाके वाजविले होते.