बगदाद – इस्लामिक स्टेटशी संबंधित एका वरिष्ठ म्होरक्याला अटक केली असल्याचा दावा इराकने केला आहे. हा म्होरक्या अल कायदाशी दीर्घकाळापासून संबंधित होता. सीमेपलिकडे केलेल्या कारवाईमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याचे इराकने म्हटले आहे.
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल काधीमी यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. अटक केलेल्या इस्लामिक स्टेटच्या या म्होरक्याचे नाव सामी जसीम असे आहे. तो इस्लामिक स्टेटचे सर्व आर्थिक व्यवहार बघत असतो. इस्लामिक स्टेटचा ठार झालेला कमांडर अबू वकर अल बगदादी याच्या कार्यकाळात सामी हा इस्लामिक स्टेटचा डेप्युटी लीडर म्हणून कार्यरत होता, असेही काधीमी यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
जसीम सामी याला पकडण्याची मोहिम सीमेपलिकडे जाऊन करण्यात आलेली इराकी फौजांची आतापर्यंतची सर्वात कठीण मोहिम होती, असेही काधीमी यांनी म्हटले आहे.
जसीम याला विदेशात अटक केली गेली आहे, असे जरी म्हटले असले तरी त्याला कोणत्या देशातून अटक करण्यात आली आहे, हे स्पष्ट केले गेलेले नाही. जसीम याला विदेशात अटक करून इराकमध्ये आणण्यात आले आहे, असे इराकच्या गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जसीम याने इराकमध्ये अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झारकवी याच्याबरोबरही काम केले आहे. झारकवी हा मूळचा जॉर्डनमधील होता. 2006 मध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात तो मारला गेला होता. जसीम याने इराकमधील अनेक सुरक्षा पदे मिळवली. त्यानंतर 2014 मध्ये अल कायदातील गट फुटून इस्लामिक स्टेटने खिलाफत स्थापन केल्याचे जाहीर केल्यावर 2015 मध्ये जसीम सीरियामध्ये गेला. तेथे तो अबू वक्र अल बगदादीचा डेप्युटी लीडर बनला. बगदादी 2019 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाला.