मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज ड्रग्ज प्रकरणात न्यायालयाकडून आजही कोणताही दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर त्याच्या जामिनावरील सुनावणीसाठी पुढील तारीख दिली आहे. यानुसार आता पुढील सुनावणी बुधवारी (13 ऑक्टोबर) होणार आहे.
सुनावणी दरम्यान आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी गर्दी होत असून त्यात करोनाशी संबंधित शारीरिक अंतराचे पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर न्यायालयाने केवळ ज्येष्ठ वकिलांनाच सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरुन सरकारी वकील आणि ऍड. अमित देसाई यांच्याच खडाजंगी झाली. देसाई यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्याची विनंती केली. मात्र, विशेष सरकारी वकील सेठना यांनी गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली.
दरम्यान, याआधी आर्यन खानच्या जामिनावर मेट्रोपॉलिटन कोर्टासमोर याचिका आली होती. तेव्हा न्यायालयाने जामिनावर सुनावणीचा अधिकार विशेष सत्र न्यायालयाला असल्याचं सांगत ही याचिका फेटाळली होती.