नवी दिल्ली – इस्रायलने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये सीरियातील इराणचा वाणिज्य दूतावास उद्ध्वस्त झाला आहे. या ड्रोन हल्ल्यामध्ये वाणिज्य दूतावासातील ७ कर्मचारी ठार झाले आहेत. या वरून इराणने इस्रायलवर जोरदारआगपाखड केली आहे. इराण आणि इराणमधील लष्करी गटांनी इस्रायलच्या या कृतीला प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.
इराणमधील सर्वोच्च लष्करी यंत्रणा असलेल्या सुप्रिम नॅशनल सिक्युरीटी कौन्सिलची काल संध्याकाळी बैठक झाली आणि इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली, असे माध्यमांनी म्हटले आहे. मात्र बैठकीतील अन्य तपशील प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
गाझामध्ये आणि लेबेनॉनच्या सीमेजवळ इस्रायलविरोधात लढणाऱ्या दहशतवादी संघटनांना इराणमधील लष्करी गटांचे सहकार्य आहे. यामुळे इस्रायलने नेहमीच इराणच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. सोमवारी इस्रायलने प्रथमच दमास्कसमधील इराणच्या वाणिज्य दूतावासाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष देखील वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत लेबेनॉनमधील हिज्बुल्ला आणि येमेनमधील हौथींच्या माध्यमातून इस्रायलवर हल्ले केले जात होते. मात्र आता इस्रायलच्या हल्ल्याला इराणकडून प्रत्यक्षप्रत्युत्तर दिले जाईल का नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. इस्रायलने हिज्बुल्लाला उघड युद्धाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलच्या कृतीबद्दल इराणने अमेरिकेला जबाबदार धरले आहे.